बीओबी कॅरम: विकास महाडिक, कोमल कदम विजेते बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय कॅरम संघ निवड चाचणी स्पर्धेमध्ये विकास महाडिकने पुरुष एकेरीचे तर कोमल कदमने महिला एकेरीचे विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यात उत्तम प्रारंभ करणाऱ्या हेमंत शेलारला गतविजेत्या विकास महाडिकने ११-१ असे चकविले. परिणामी हेमंत शेलारला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. महिलांच्या अंतिम सामन्यात कोमल कदमने प्रत्येक बोर्डात शानदार खेळ करीत अर्चना विश्वकर्माला १२-० असे सहज पराभूत करून अजिंक्यपदाला गवसणी घातली. जनरल मॅनेजर श्री. मनीष कौरा व डेप्युटी जनरल मॅनेजर श्री. अर्षद खान यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या-उपविजेत्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय कॅरम स्पर्धेमधील उपांत्य फेरीच्या पुरुष एकेरी सामन्यात विकास महाडिकने अरविंद दपकेचा १३-४ असा तर हेमंत शेलारने रणजीत रावचा ८-६ असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात कोमल कदमने इंदिरा राणेवर १६-० असा तर अर्चना विश्वकर्माने गुणवती करकेरावर ७-१ असा विजय मिळवून अंतिम फेरीत धडक दिली होती. पहिल्या चार क्रमांकाचे विजेते बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागीय पुरुष व महिला कॅरम संघाचे १५ जुलै दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय आंतर विभागीय बीओबी कॅरम स्पर्धेत प्रतिनिधित्व करणार आहेत. निवड झालेल्या मुंबईच्या खेळाडूंना विशेष मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण व ज्येष्ठ कॅरम पंच प्रणेश पवार कार्यरत आहेत. आयडियल सहकार्याने ही स्पर्धा बेलार्ड पियर येथे ५१ स्पर्धकांच्या सहभागाने उत्साहात पार पडली. **********